प्रयागराजचा महाकुंभ हा आता केवळ धार्मिक मेळावा राहिला नसून, आर्थिक उलाढालींचे केंद्र बनला आहे. या महाकुंभामध्ये अंदाजे ३ लाख कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होईल असा अंदाज आहे. आस्था आणि अर्थव्यवस्था यांचा अनोखा संगम या निमित्ताने पाहायला मिळत आहे.
१३ जानेवारीला सुरु झालेल्या या पर्वात २६ फेब्रुवारी पर्यंत, ४० कोटी भाविक हजेरी लावतील, असा प्राथमिक अंदाज होता. २ लाख कोटींची उलाढाल अपेक्षित होती. मात्र सरकारी आकडेवारीनुसार, २० फेब्रुवारीलाच भाविकांची संख्या ५६.७५ कोटींच्या पलीकडे गेली आहे. अजूनही संगमावर डुबकी मारण्यासाठी येणाऱ्यांचा ओघ आटलेला नाही. भाविकांच्या वाढत्या लाटेमुळे, केवळ प्रयागराजच नाही तर आसपासच्या अयोध्या, वाराणसी आणि इतर धार्मिक केंद्रांमध्येही आर्थिक उलाढाल वाढली आहे.
स्थानिक उद्योगांना चालना :
मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सामावून घेताना हॉटेल्स, गेस्टहाऊस आणि अन्य भाड्याच्या जागांना विक्रमी बुकिंग मिळत आहे. लहानमोठ्या फूड स्टॉल्सना चालना मिळाली आहे. तसेच पॅकेज्ड फूडच्या विक्रीनेही उच्चांक गाठला आहे. विमान, रेल्वे, बस, कॅब्स आणि मालवाहतुकीच्या सेवांसाठी मागणी वाढली आहे. त्याशिवाय धार्मिक कपडे, पूजा साहित्य आणि हस्तशिल्पांच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे. वैद्यकीय सुविधा, आयुर्वेदिक केंद्राचीही पाहुण्यांना गरज भासत आहे. याशिवाय मीडिया, जाहिराती आणि मनोरंजन उद्योगालाही मोठी गती मिळाली आहे. प्रमोशन्स, प्रायोजकत्व आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वाढ झाली आहे, ज्याचा लहान व्यवसाय आणि स्थानिक कलाकारांना मोठा फायदा झाला आहे.
पायाभूत सुविधा आणि सुव्यवस्थेसाठी सरकारने आखलेल्या अनेक योजनांमध्ये, स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला आहे. टेलिकॉम क्षेत्रानेही आपले कार्य वाढवले आहे, ज्यामध्ये एआय आधारित सुरक्षा, सुधारीत सुरक्षा उपाय आणि मोठ्या प्रमाणात मोबाईल नेटवर्क्सची वाढ केली आहे, यात मोठ्या प्रमाणात कार्यक्षम मनुष्यबळ सामावले गेले आहे.
प्रयागराजच्या पलीकडे:
महाकुंभ २०२५ चा आर्थिक प्रभाव प्रयागराजच्या पलीकडे खूप दूरपर्यंत पसरला आहे. अयोध्या आणि वाराणसीसारख्या जवळच्या शहरांमध्ये पर्यटन, व्यापार आणि धार्मिक उलाढालींत वाढ दिसून आली आहे. महाकुंभासाठी जाणारे अनेक भक्तगण जवळपासच्या धार्मिक स्थळांना भेटी देत आहेत. त्यामुळे तेथेही हॉस्पिटॅलिटी, खाद्यसेवा आणि रिटेल क्षेत्रातील व्यापाराच्या संधींमध्ये वाढ झाली आहे.
महाकुंभ २०२५: ऐतिहासिक आर्थिक मैलाचा दगड
महाकुंभ २०२५ हा फक्त एक धार्मिक कार्यक्रम नाही, तर एक परिवर्तनात्मक आर्थिक शक्ती आहे, जी भारताच्या व्यापार आणि वाणिज्याचे एक नवीन मानक सेट करत आहे. त्याच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वित्तीय प्रभावामुळे, या घटनेचा भारताच्या आर्थिक आणि सामाजिक परिप्रक्ष्यात दीर्घकालीन प्रभाव पडण्याची अपेक्षा आहे.